छत्रपती संभाजीनगर : मागील वर्षात जिल्ह्यासह शहरातूनही कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला होता. मात्र, त्यांचा संसर्ग पुन्हा वाढत असून, गेल्या आठवड्यात शहरात कोरोना रुग्ण आढळला. त्यात चार रुग्ण आढळले होते. गुरुवारच्या अहवालात तब्बल आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभागासह मनपाचे धाबे दणाणले. व्हायरलमुळे सर्वत्र सर्दी, खोकला, तापेचे रुग्ण आढळत असल्याने यांनीही कोरोना चाचणी करण्याचे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले.
राज्यासह जिल्ह्यात आणि शहरात ही थंडी कधी अधिक थंडी असे वातावरणात बदल होत आहेत. त्यामुळे संसर्गजन्य आजार पसरला असून, घराघरात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. परिणामी, दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यातच कोरोना संसर्गाने पुन्हा मनपाकडून कोरोना चाचणी करण्यात येत असून, मागच्या आठवड्यात चाचणीत चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. या चार रुग्णांमध्ये दोन मुली व दोन महिलांचा समावेश आहे.
यातील दोन पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा इतकी झाली आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या चाचण्यामधून आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यात चार पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.
या भागातील रुग्ण पॉझिटिव्ह
शहरातील आठ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून त्यामध्ये न्यायनगर गल्लीनंबर – ७ मधील ४० वर्षीय पुरुष, रँगटीपूरा येथील २२ वर्षीय महिला, कांचनवाडीतील ५४ वर्षीय पुरुष, सिल्कमिल कॉलनी येथील ३१ वर्षीय पुरुष, क्रांतीचौक येथील ५५ वर्षीय पुरुष, हिनानगर चिकलठाणा येथील ३५ वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी एन-२ मधील ५६ वर्षीय महिला, सादातनगर येथील ४२ वर्षीय महिला या रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांचे आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी घाटी रुग्णालयाच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.