बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मळद गावात लुटमार करणाऱ्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव बारामती शहर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदीप बाळू गायकवाड (वय २६, रा. भैय्या वस्तीी, मळद) हे दिवसभर एमआयडीसीत काम करून मोटरसायकलवर आपल्या घरी जात असताना, मळदचे सुरज रवींद्र मदने व बबन अहिवळे यांनी त्याला मोटरसायकल आडवी लावून बळजबरीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने ते देण्यास नकार दिला असता त्या दोघांनी त्याला फायटरने मारहाण केली. त्यानंतर त्याला परत मळद ग्रामपंचायतीसमोर अडवले.
त्यावेळी त्या ठिकाणी मळद गावातील गुंड भोऱ्या बापूराव जाधव व अमोल रवींद्र मदने हे सुद्धा त्या दोघांना येऊन मिळाले. त्या सर्वांनी त्याला परत मारहाण करून त्याच्या खिशातील बाराशे रुपये काढून घेतले. त्याला दमदाटी केली. या टोळीबद्दल यापूर्वीसुद्धा लहान-मोठ्या तक्रारी पोलिस ठाण्यात नाव न सांगण्याचे अटीवर येत असतात. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव याला तात्काळ अटक केली. बाकीचे आरोपी त्याला अटक होताच पसार झाले. त्याला न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, या टोळीवर नजीकच्या काळात प्रतिबंधक कारवाई होणार आहे. त्यांच्याविरुद्ध छोट्या-मोठ्या तक्रारी असतील त्या निर्भीडपणे लोकांनी पोलीस स्टेशनला द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी दळवी, सहाय्यक पोलीस फौजदार जगदाळे कोळेकर यांनी केलेली आहे.