ठाणे : ठाण्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानांतर्गत ठाणे शहराचा (Fund to Thane City) संपूर्ण कायापालट करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून 130 कोटी रुपयांचा निधी ठाणे शहरास देण्यात आला. त्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. शहर सुशोभीकरणाअंतर्गत संरक्षक भिंती आणि दर्शनी भागातील रंगकामासाठी आत्तापर्यंत 34.64 कोटी रुपयांचे काम झालेले असून, त्याचे देयक अदा करण्यात आलेले आहेत.
रंगकाम करताना निकृष्ट दर्जाचे रंगकाम साहित्य वापरल्याने पावसाच्या पाण्याने रंग, डिस्टेंपर वाहून जात अवघ्या काही महिन्यांपूर्वी काढलेले रंग चित्र खराब होत असल्याने जनतेचे कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्यात जात आहेत. परंतु, अधिकाऱ्यांना याचे कुठलेही गांभीर्य नाही.
चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या रंगकामाबाबत, पावसाच्या पाण्यात वाहून जात खराब होत असलेले रंगचित्रे व रंगकामाबाबत या प्रकल्पावरील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना पत्राद्वारे, फोनद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे, प्रत्यक्षदर्शी छायाचित्रांसह तक्रारी दाखल करत विचारणा केली असता ‘एखाद टक्का असेल की…’ अशी उत्तरे अधिकारी देतात. याबरोबरच रंगकामाबाबत माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना देखील चुकीची व दिशाभूल करणारी उत्तरे मिळत आहेत.
त्यामुळे आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेत शासनाने दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करत निकृष्ट दर्जाची रंगचित्रे रंगकामाची चौकशी करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे. याची पर्यवेक्षणीय जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे चुकीचे काम होऊनही दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी याबाबत सातत्याने पाठपुरावा करणारे ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.