गोंदिया : चालू महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी देखील झालेल्या पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी अद्यापही शेतात आहे. चालू महिन्यात पूर आणि पावसामुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल कृषी विभागाने (Department of Agriculture) तयार केला. तब्बल २२ हजार १८५ शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला असून ६०३ गावांतील ११ हजार ६८७.५० हेक्टर क्षेत्रातील पिकांना त्याचा फटका बसला.
जून महिन्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. यावर्षी पाऊस होतो की नाही, अशी हुरहूर शेतकऱ्यांना लागून होती. हवामान विभागाचा अंदाज देखील खोटा ठरू लागला होता. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त (Farmers worried) झाले होते. जुलै महिन्यात पावसाने दमदार कमबॅक केला. त्यानंतर, मात्र पावसाने दडी मारली. ऊन तापत असल्यामुळे पेरणी झालेल्या बांधांमध्ये भेगा पडणे सुरू झाले होते. अशात हवामान खात्याने ९ तारखेपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. ९ ऑगस्ट मंगळवारी दिवसा आणि रात्रभर तसेच बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.
संततधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. जिल्हा जलमग्न झाला. नदी आणि नाल्यांतील पाण्याचा पूर शेतात शिरला. त्यामुळे शेतात लावलेले रोवणे आणि पऱ्हे पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले. तर, काही ठिकाणचे पऱ्हे आणि रोवणे कुजले. ही चिंता दूर होत नाही, तोच पुन्हा १४ आणि १५ ऑगस्ट रोजी आलेल्या संततधार पावसामुळे पुन्हा थैमान घातले. अद्यापही अनेक भागांत पुराचे पाणी साचून आहे. शेतातील पीक कुजत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चिंतेचे वातावरण आहे.
महसूल विभाग (Department of Revenue) आणि कृषी विभागाने (Department of Agriculture) जिल्ह्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार केले. त्यानुसार जिल्ह्यातील ६०३ गावांतील २२ हजार १८५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ६७९.५० हेक्टर क्षेत्रावरील धान आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक कार्यालयाने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. नुकसान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचून आहे. त्यामुळे, त्या भागातील धान पिक आणि भाजीपाला देखील कुजले. शिवारात कुजका वास सुटला आहे.
सालेकसा, शिरपूर, कालीसराड आणि पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. अनेकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अद्यापही अनेक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत आहे. सालेकसा ते साखरीटोला आणि आमगाव मार्गावरील वाहतूक अद्यापही बंद आहे.