मुंबई: आर्यन खानला (Aaryan Khan) अमली पदार्थ प्रकरणी समीर वानखेडेविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात शाहरुख खानलाही (Shahrukh Khan) आरोपी करण्यात यावं, अशी मागणी करणारी याचिका एका वकीलाने उच्च न्यायालयात केली आहे.
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी (Drugs Case) एनसीबीच्या (NCB) चौकशी अहवालावरून सीबीआयने केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडेंसह अन्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी 21 ऑक्टोबर 2021 रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला प्रतिबंधित ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्या प्रकरणीनंतर तपासावर आणि समीर वानखेडेंवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर एनसीबीने विशेष तपास समिती स्थापना केली.
विशेष समितीने दिलेल्या अहवालानुसार, समीर वानखेडे यांचे निकटवर्तीय किरण गोसावी यांच्यामार्फत शाहरुख खानने आर्यनला वाचवण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 18 कोटी रुपये देण्याचे कबूल करून त्यापैकी 50 लाख रुपये दिल्याचंही म्हटले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार, लाच घेणाऱ्यासह लाच देणाराही तेवढाच दोषी असून पाच वर्षांच्या कारगृहाच्या शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे सीबीआयने नोंदवलेल्या तक्रारीत शाहरुखसह आर्यनलाही आरोपी बनवण्याची मागणी याचिकाकर्ते आणि वकील राशिद पठाण यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केली आहे. शाहरुख-आर्यनसह समीर वानखेडे अन्य सहआरोपींची नार्को, ब्रेन मॅपिंग चाचणी व लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणीही याचिकेत केली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.