सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडिक उपस्थित होते. एफआरपी दर वाढत असताना एमएसपी वाढत नसल्याने साखर कारखाने संकटात येत आहेत. याबाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे स्वरूप महाडिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाचे राजकारण तापलेले असताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेणे निश्चितच जिल्ह्याच्या राजकारणात नवीन काहीतरी घडणार असल्याचे संकेत देत आहेत. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर चहापान होऊन ते निघून गेले.
यावेळी भाजपच्या राज्य महिला आघाडीच्या उपाध्यक्षा शौमिका महाडिक, ग्रिष्मा महाडिक, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, आदिल फरास आदी उपस्थित होते.
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले
आमदार अमल महाडिक यांना याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार नागाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. वाटेतच माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे निवासस्थान असल्याने त्यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री आपल्या निवासस्थानी आल्याचे त्यांनी सांगितले.