आज संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस साजरा केला जात आहे. नागपूरमध्ये सुद्धा महाराष्ट्र दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. राज्य राखीव पोलीस दल, नागपूर शहर पोलिसांचे पुरुष आणि महिला तुकड्या, वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस, एनसीसी आणि राष्ट्रीय सेवाचे तुकड्या यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
एखादी व्यक्ती रोज बडबड करत असेल तर त्याला रोज उत्तर देता येणार नाही. वारंवार बडबड करण्याची जागा कुठे असते ते तुम्हाला सांगायची गरज नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आजचा दिवस संपूर्ण भारतासाठी समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प घेण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य काय असते याची शिकवण दिली. स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा महाराष्ट्र असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
देशाचा जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राकडे देशाचा पॉवर हाऊस म्हणून पहिले जाते. तसेच देशाच्या जीडीपीमध्ये सगळ्यात जास्त वाटा महाराष्ट्राचा आहे. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जाते. देशाचे २० टक्के उत्पादन हे महाराष्ट्र करते. सर्वाधिक निर्यात करणारे राज्य महाराष्ट्र आहे. सगळ्यात जास्त थेट परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आहे. नागपुरचा विकास होत आहे. नागपुरात सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे. पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत. भविष्यात नागपूर देशाचा लॉजिस्टिक हब बनेल अशा पद्धतीने तयारी महाराष्ट्र सरकार करत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी पुण्यातील सभेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते, भाजप पुन्हा सत्तेमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. टरबुजाला घोडे नाही, हातगाडी लागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस आत्तापर्यंत धाराशिवाला अनेक वेळा जाऊन आले पण ते कधी तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गेले नाही. ४०० पार म्हंटल्या नंतर लोक अजूनही तडीपार असे म्हणत आहेत. यांना देशाची घटना बदलायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.