'मिसिंग लिंकवर फक्त दोनच खड्डे..,' मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू होऊन अवघे दोन महिने होत असतानाच पहिल्याच पावसात काही ठिकाणी खड्डे पडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देत प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेचे समर्थन केले आहे.
१ मे रोजी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलेल्या या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच पावसानंतर काही भागात खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मिसिंग लिंकवर सर्वत्र खड्डे पडलेले नाहीत. कनेक्टरजवळ फक्त दोन खड्डे पडले आहेत. मात्र काही लोकांना कुठल्याही गोष्टीचा बाऊ करून ती मोठी करून दाखवण्यात आनंद मिळतो.”
ते पुढे म्हणाले, “कोणतेही मोठे काम पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला पाऊस पडल्यानंतर रस्त्याची टिकाऊ क्षमता तपासली जाते. त्या काळात काही तांत्रिक बाबी समोर येतात आणि त्यानुसार आवश्यक दुरुस्ती केली जाते.”
फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना प्रसिद्ध म्हणीचाही उल्लेख केला. “निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे टीका होत असेल तर हरकत नाही. एमएसआरडीसी योग्य ती काळजी घेईल आणि आवश्यक त्या सुधारणा करेल,” असे त्यांनी सांगितले.
रस्त्यावर वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “नवीन उड्डाणपूल किंवा रस्ता तयार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मॅस्टिक ॲस्फाल्ट काही प्रमाणात स्थिरावतो. त्यानंतरच तो पूर्ण क्षमतेने कार्य करतो. या सर्व प्रक्रिया इंजिनिअरिंगचा भाग आहेत. कुठे काही कमतरता आढळल्यास त्या निश्चितपणे दूर केल्या जातील.”
प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “देशातील सर्वात उंच पूल, सर्वात रुंद बोगदे आणि धरणाखालून जाणारा बोगदा आम्ही प्रथमच उभारला आहे. त्यामुळे केवळ टीका करण्यासाठी टीका करणे योग्य नाही.”
दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, पुढील काळात एमएसआरडीसी या ठिकाणी कोणत्या दुरुस्तीची कामे करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






