'विहानच्या मृत्यूला जबाबदार कोण?' चेंबूर दुर्घटनेवरून शिवसेनेचा बीएमसीवर हल्लाबोल
चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हा मुद्दा आता राजकीय वर्तुळातही गाजू लागला आहे. या दुर्घटनेवरून शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) निष्काळजीपणाचा आरोप करत पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला अधिक आर्थिक मदत देण्याची मागणीही पक्षाने केली आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव शायना एन. सी. यांनी जारी केलेल्या निवेदनात बीएमसीच्या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, बीएमसीने संबंधित झाडाची १२ मे २०२६ रोजी तपासणी करून ते सुरक्षित असल्याचे सांगितले होते आणि २९ मे रोजी त्याची छाटणीही करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान झाडाच्या मुळांचे नुकसान झाल्याची बाब पालिकेच्या चौकशीत समोर आली असून या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
दुर्घटनेला केवळ मुसळधार पाऊस कारणीभूत नसल्याचा दावा करत शिवसेनेने झाडांच्या देखभालीतील त्रुटी, मुळांची योग्य तपासणी न होणे आणि विभागांतील समन्वयाचा अभाव यामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.
तसेच, स्थानिक पातळीवर यापूर्वी झाडाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचाही दावा पक्षाने केला आहे.
पावसाळ्यापूर्वी झाडांचे ऑडिट करा #Shivsena #EknathShinde pic.twitter.com/B14rnGXwo7 — Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 4, 2026
या घटनेनंतर शिवसेनेने राज्य सरकार आणि बीएमसीसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
बीएमसीने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा पक्षाच्या राष्ट्रीय सचिव शायना एन. सी. यांनी दिला आहे. दरम्यान, चेंबूरमधील या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आगामी काळात बीएमसी यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






