बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत एकूण आलेल्या तीन आक्षेपापैकी एका कर्जावरील आक्षेप मान्य करत बेंबळी गटातील नितेश इंगळे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. तर येडशी गटातील देवदत्त मोरे आणि आणि पाडोळी गणातील सुरज इंगळे यांच्या विरुद्धचे आक्षेप फेटाळण्यात आले असून त्यांच्या उमेदवाऱ्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यात नामनिर्देशन पत्रे छाननीअंती ज्या तीन नामनिर्देशन पत्रावर आक्षेप आले होते, त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुनावणी घेण्यात आली. संक्षिप्त चौकशी करण्यात आली.
संबंधितांचे युक्तिवाद विचारात घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
जिपच्या येडशी गटातील देवदत्त मोरे यांच्याविरुद्धचा आक्षेप अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि त्यांची उमेदवारी कायम आहे बेंबळी जिप गटातील नितेश शिवाजी इंगळे यांच्याविरुद्धचा आक्षेप अर्ज मान्य करण्यात आलेला आहे, आणि त्यांची उमेदवारी रद्द झाली आहे. तर पाडोळी पंचायत समिती गणातील सुरज दादाराव इंगळे यांच्याविरुद्धचा आक्षेप अर्ज फेटाळण्यात आला आहे, आणि त्यांची उमेदवारी कायम आहे. असे कळविण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा भाग म्हणून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे आणि मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, १६ ते २१ जानेवारी दरम्यान नामांकन दाखल करता येईल आणि २२ जानेवारी रोजी छाननी केली जाईल. २७ जानेवारी रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत नामांकन मागे घेता येईल. २७ जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होईल आणि मतमोजणी आणि निवडणूक निकाल ७ फेब्रुवारी रोजी जाहीर केले जातील.
या निवडणुका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात होतील. निवडणूक आयुक्त वाघमारे म्हणाले की, या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंत तयार केलेल्या मतदार याद्या वापरल्या जातील. नियमांनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांसाठी मतदार याद्या वेगळ्या करण्यात आल्या आहेत आणि या टप्प्यावर नावे जोडता किंवा वगळता येणार नाहीत.






