झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन
२६ जानेवारी रोजी सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू होता. अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित असतानाच झेंडावंदन सुरू असताना पीएसआय मोहन जाधव यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. झेंडावंदनावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आले की, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. खाली पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली.
मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मोहन जाधव यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर आनंदाच्या वातावरणात क्षणातच शोककळा पसरली. विशेष बाब म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच जाधव यांना पीएसआय पदावर पदोन्नती मिळाली होती. त्याआधी ते सोलापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यदक्षतेचा आदर्श निर्माण केला होता.
सहकारी अधिकाऱ्यांच्या मते, मोहन जाधव हे अत्यंत शांत स्वभावाचे, संयमी आणि सर्वांना मदतीसाठी तत्पर असणारे अधिकारी होते. कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांसाठी ते मार्गदर्शक आणि आधारवड होते. ते कधीही आवाज न चढवता काम समजावून सांगत. प्रत्येकाशी आपुलकीने वागत. आज आम्ही केवळ अधिकारी नव्हे, तर एक चांगला माणूस गमावला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आशा भावना व्यक्त केल्या आहेत. कर्तव्य बजावत असतानाच, देशाच्या प्रजासत्ताक दिनीच आलेले हे निधन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
पीएसआय मोहन भीमा जाधव यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असून, त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्यनिष्ठ अधिकारी देशसेवेतच हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, प्रजासत्ताक दिनी झालेली ही घटना कायमस्वरूपी दुःखद आठवण ठरणार आहे.






