जेसन गिलेस्पी(फोटो-सोशल मीडिया)
Why did Jason Gillespie delete the tweet? ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आता चांगलेच चर्चेत आले आहे. सोशल मीडिया पोस्टवरून ते वादात सापडले आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधून बांगलादेशला वगळण्याशी संबंधित एका प्रकरणी ते वादात आले आहे. गिलेस्पीकडून या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट करण्यात आले होते, जे त्यांनी नंतर डिलीट देखील केले. आता, त्यांनी ट्विट डिलीट करण्यामागील कारण नेमके काय? याबाबत स्पष्टता दिली आहे.
जेसन गिलेस्पी यांनी सांगितले की, ट्विट पोस्ट केल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अपमान आणि शिवीगाळ करण्यात आली. एका माजी वापरकर्त्याने त्यांना विचारणा केली की, त्यांनी ट्विट का डिलीट केले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की फक्त एक साधा प्रश्न विचारल्याबद्दल त्यांना शिवीगाळ करण्यात आली. म्हणूनच त्यांनी ट्विट डिलीट केले. काही जण गिलेस्पीच्या विधानाचा अर्थ भारतीय क्रिकेट चाहत्यांवरील आरोप म्हणून देखील लावताना दिसट आहेत.
२०२६ च्या टी२० विश्वचषकातून आयसीसीकडून बांगलादेशला डच्चू देण्यात आला आहे. या निर्णयानंतर गिलेस्पीने आयसीसीच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले की, “आयसीसीने स्पष्ट केले असते का की बांगलादेश त्यांचे सामने भारताबाहेर का खेळू शकत नाही?” त्यांनी असे देखील निदर्शनास आणून दिले की भारताने यापूर्वी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दर्शवला होता. परंतु नंतर त्यांना पाकिस्तानबाहेर सामने खेळण्याची परवानगी मिळाली होती. गिलेस्पीकडून विचारणा करण्यात आली की, या प्रकरणांमध्ये वेगवेगळे निकष लागू केले जात आहेत का?
दोन दिवसांपूर्वी, आयसीसीकडून २०२६ च्या टी२० विश्वचषकातून बांगलादेश क्रिकेट संघाला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात त्यांचे सामने खेळण्यास नकार दिला होता आणि त्यांचे सामने दुसऱ्या देशात हलवण्याची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा : IND vs NZ T-20 Series : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी! संघातील स्थान राहणार कायम; तिलक वर्मा T20I मालिकेबाहेर
आयसीसीने बांगलादेशच्या मागणीला केराची टोपली दाखवली आणि स्पष्टपणे सांगितले की स्पर्धा सुरू होण्यास फक्त तीन आठवडे शिल्लक आहेत. लॉजिस्टिक आणि इतर व्यवस्थेमुळे इतक्या कमी वेळेत सामने दुसऱ्या देशात हलवणे शक्य होणार नाही. शिवाय, आयसीसीने भारतातील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय एजन्सीची नियुक्ती देखील केली, ज्याने बांगलादेश संघाला कोणताही धोका नसल्याची पुष्टी देखील केली. तरी देखील बांगलादेशच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आयसीसीने त्यांना स्पर्धेबाहेर करण्याचा निर्णय घेतला.






