दानवेंना तो व्हिडीओ सुनील तटकरेंनी पाठवला? शिंदेच्या आमदाराच्या आरोपाने नव्या वादाची ठिणगी
अंबादास दानवे यांनी व्हायरल केलेला तो व्हिडीओ खासदार सुनील तटकरे यांनीच दानवेंना पाठवला असावा, त्यांचे ठाकरे गटाशी साटेलोटे आहेत. रायगडमधील कुटीलनीतीचे राजकारण पाहता, त्यांनीच हा व्हिडीओ पाठवला असण्याची शक्यता आहे. आम्ही घरातच शत्रू पाळू ठेवला आहे. राज्यात राष्ट्रवादी आणि रायगडमंध्ये सुनील तटकरेंच्या रुपाने आम्ही शत्रू पाळला आहे, असा खळबळजनक आरोप महेंद्र थोरवेंनी केला आहे.
राज्यात एककीकडे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे महेंद्र दळवी चांगलेच अडचणीत आले होते. त्यातच आता महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर आरोप करत नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. महेंद्र थोरवे यांनी दळवींचा व्हिडीओ व्हायरल होण्यात सुनील तटकरेंचा हात असल्याचा संशय थेटपणे बोलून दाखवला.
महेंद्र थोरवे म्हणाले की, “महेंद्र दळवी असं काही करणार नाहीत, याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. दानवे यांनी जाणूनबुजून अधिवेशनादरम्यान हा व्हिडिओ प्रसारित केला, ज्यामागे रायगडमधील स्थानिक राजकारणाशी संबंधित धागे असू शकतात. रायगडमध्ये सुनील तटकरे सातत्याने शिवसेना आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. ते कुटील राजकारण करतात. त्यामुळे तटकरे आणि अंबादास दानवे यांनी मिळून हा व्हिडिओ व्हायरल केला असावा,” असा आरोप दळवींच्या समर्थकांकडून करण्यात आला.
अंबादास दानवे यांना सुनील तटकरेंची साथ असू शकते. पारंपरिक शिवसेना–भाजप –रिपाई युती असूनही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला सत्तेत घेतले आणि त्याचा तोटा रायगडमधील शिवसेना आमदारांना सहन करावा लागत आहे. “सुनील तटकरे विरोधकांना हाताशी धरून अनेक गोष्टी करतात. यावेळीही त्यांनी ठाकरे गटाशी साटेलोटे करून महेंद्र दळवींचा व्हिडिओ व्हायरल करण्यास मदत केली असावी,” असा आरोप थोरवे यांनी केला. या गंभीर आरोपांवर सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंबादास दानवे यांनी त्यांच्या ट्विटर एक्स अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमापीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?ट असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.






