सोलापूर : आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये अमरावती सीईओ दिलीप स्वामी असा उल्लेख झाल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. कालावधी पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची बदली होणार असून गेल्या दोन महिन्यापासून अशी चर्चा आहे.
दोघेही बदलीपूर्व प्रशिक्षणासाठी मसूरीला जाऊन आले आहेत. जिल्हाधिकारी शंभरकर यांना मुदतवाढ मिळाल्याचीही चर्चा आहे. तर इकडे जिल्हा परिषदेचे सीईओ स्वामी कलेक्टर म्हणून कोठे जाणार? याची चर्चा बऱ्याच दिवसापासून रंगली आहे.
अशात आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम मंत्रालयातून जाहीर झाला होता या कार्यक्रमात स्वच्छता दिंडीच्या समारोपाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील व त्या कार्यक्रमाचे नियोजन अमरावतीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे आहे, असे दाखविण्यात आले होते. सीईओ स्वामी जिल्हाधिकारी म्हणून नाशिक किंवा कोल्हापूरला जातील अशी चर्चा होती, पण अशात मंत्रालयातून असा मेसेज पडल्याने ते सीईओ म्हणून अमरावतीला जाणार का? अशी चर्चा आता जिल्हा परिषदेत रंगली आहे.
मुख्यमंत्र्याचा तो रुद्रावतार…
आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे पंढरपूरचा दौरा केला होता. या दौऱ्यात 65 एकरात पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी व सीईओना झापले होते. त्यानंतर मंत्रालयातून हा दौरा जाहीर झाला. या दौऱ्यात नमूद केलेली अमरावतीची पोस्ट ही अनावधानाने झालेली चूक की पुढची तयारी, अशी कर्मचाऱ्यांमध्ये आता चर्चा रंगली आहे.