दीनानाथ मंगेशकर रुग्णालय डीन धनंजय केळकर यांची पुण्यात पत्रकार परिषद (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयाकडून पैशांची मागणी करत उपचार देण्यास दिरंगाई करण्यात आली. यामध्ये जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे फक्त पुण्यातून नाही तर संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय धर्मादाय असताना देखील रुग्णांकडून लाखो रुपयांची मागणी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तनिषा भिसे यांच्या उपचार करणाऱ्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. या प्रकरणी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून त्यांची भूमिका स्पष्ट केली जात आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. केळकर म्हणाले की, “या प्रकरणाच्या मध्यभागी असलेले सुश्रुत घैसास यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. ते मानद प्रसुती व स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. ते आमच्याकडे कर्मचारी म्हणून नाही तर सल्लागार म्हणून गेली 10 वर्षे आहेत. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. राजीनामा देताना कारण सांगितले की, गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत. धमक्यांचे फोन, समाजमाध्यमांवर होणारी टीका, सामाजिक संघर्ष आणि तणावाचे वातावरण हे सहन करण्याच्या पलिकडचे आहेत. त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. इतर रुग्णांवर अन्याय आणि कुटुंबियांच्या सुरक्षेकरिता राजीनामा देत असल्याचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी नमूद केले आहे,” अशी माहिती धनंजय केळकर यांनी दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “डॉ. घैसास यांच्या आत्ता असलेल्या रुग्णांची येत्या दोन ते तीन दिवसांत पर्यायी व्यवस्था केली जाईल. तीन दिवसांत ते त्यांचं काम संपवतील. रुग्णालयामध्ये मोठ्या रक्कमेची डिपॉझिट असल्याची पॉलिसी होती. लहानसाठी ही पॉलिसी नव्हती. मात्र आता तीन दिवसांपासून ती काढुन टाकली आहे. स्टाफच्या बोलण्यामधील संवेदनशीलता पाहिजे ती जास्त काम असल्यामुळे कमी होते. रुग्णांप्रती मदतीचा भाव स्टाफला ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहोत. यासाठी सूचना आणि ट्रेनिंग सुरु केले आहे,” अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी दिली आहे.
धनंजय केळकर म्हणाले की, “या प्रकरणामध्ये अजून तीन अहवाल येणे बाकी आहे. शासकीय अहवाल अद्याप आलेला नाही. त्या तिन्ही अहवालांचा अभ्यास करुन यावर मत मांडणे जास्त उचित ठरेल. प्रत्येक अहवालावर मत व्यक्त करणं हे खूप घाई झाल्यासारखे होईल. आईच्या मृत्यूबाबत कॉर्पोरेशनमध्ये मिटींग झाली. याच्या मृत्यूशी काही कोणाचा संबंध नाही. डिपॉझिट हे फक्त मोठ्या शस्त्रक्रियांसाठी घेतले जात होते. रुग्ण गरिब असेल तर ते देखील घेतले जात नव्हते. जे रुग्ण भरु शकतात त्यांच्याकडून घेतले जात होते. तो आता वादाचा मुद्दा न करता ते आम्ही बंद केलं आहे,” अशी माहिती धनंजय केळकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डीन धनंजय केळकर यांना पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स थकवल्याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर ते म्हणाले की, “हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अगेन आहे. हॉस्पीटलने पालिकेचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्यामुळे त्यामध्ये आमचा एकही रुपया थकलेला नाही. थकू सुद्धा शकत नाहीत नाही तर ते बंद करतील. याबाबत कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो दोघांना पाळणे बंधनकारक आहे. कोर्टाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला तर सर्व पैसे भरणार,” अशी भूमिका धनंजय केळकर यांनी घेतली आहे.
रुग्णालयाकडून मोठ्या शस्त्रक्रियेसाठी डिपॉझिट घेतले जाते. मात्र हे डिपॉझिट घेण्याबाबत डॉक्टरांना अधिकार नसल्याचे देखील केळकर म्हणाले आहेत. ते म्हणााले की, “रुग्णांना एडमिशन फॉर्म दिला जातो. यामध्ये त्यांना अंदाजपत्रक दिले जाते. हे फक्त भिसेंना नाही तर प्रत्येक रुग्णाला दिलं जातं. त्यावर रुग्णांचे नाव, डॉक्टरांचे नाव, तसेच शस्त्रक्रिया करणार आहेत की नाही आणि त्यासाठी किती खर्च येईल याचा तपशील असतो. मात्र त्यावर डिपॉझिट लिहिण्याची पद्धत नाही. मी देखील अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत मात्र कधीही डिपॉझिट लिहिले नाही. त्यादिवशीच कोणते राहू, केतू त्यांच्या डोक्यात आला. आणि डॉक्टरांनी त्यावर 10 लाख रक्कम लिहून चौकन केला,” असे दिनानाथ रुग्णालयाचे डीन दीनानाथ मंगेशकर यांनी कबूल केले आहे. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः पत्रकार परिषद गुंडाळली.