भाजप मंत्री नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : दिशा सालियान प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. चार वर्षांनंतर दिशा सालियान हिच्या आई वडिलांनी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नितेश राणे यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “ही फार सरळ, सोपी केस आहे. ती जर (दिशाची) आत्महत्येची केस होती तर 8 जूनपासून ते आत्तापर्यंत पळापळी का चालली आहे, लपवालपवी का चालली आहे? आदित्य ठाकरेंना यातून वाचवावं का लागतंय? त्यांची जर काहीच इन्व्हॉल्व्हमेंट नसेल तर त्यांची मग एवढी पळापळ का सुरू आहे?” असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. ते म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं होतं की, त्यानुसार, कोणावरही बलात्काराचा चार्ज असेल तर सर्वात पहिले त्याच्याविरोधात केस रजिस्टर करावी लागते. त्या नियमानुसार, केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करावी, त्यांची चौकशी करावी, ज्याचं ज्याचं नाव याप्रकरणात असेल,जो न्याय अन्य लोकांना लागतो, तोच न्याय आदित्य ठाकरेंना लावावा,” असे म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, “आदित्य ठाकरे असतील, सूरज पंचोली असेल किंवा दिनो मोरिया असेल त्यांची चौकशी करावी, त्यांचा या केसमध्ये काहीच हात नसेल तर चौकशीमध्ये दूध का दूध पानी का पानी का पानी होईल, आम्हा सर्वांची थोबाडं बंद होऊन जातील. ही आत्महत्याच होती, या केसमध्ये काहीच नाहीये माझा हात, मला गोवण्यात येत आहे, असा विश्वास जर आदित्य ठाकरेंना असेल तर फार सरळ सोप आहे. त्यांनी चौकशीला सामोरं जावं, खरं काय ते सांगावं, पुरावे द्यावेत आणि आम्हाला सर्वांना खोटं ठरवावं,” असं थेट आव्हानही नितेश राणेंनी दिलं.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
औरंगजेबाच्य़ा कबरीचा मुद्दा सरकारवर उलटल्यामुळे दिशा सालियान हे प्रकरण पुन्हा काढले असल्याचे संजय राऊत म्हणाले. यावर नितेश राणे म्हणाले की, “माणसाचं वय वाढतं, पण कदाचित बुद्धी वाढत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. औरंगजेबाचा विषय , नागपूरला झलेला हिंसाचार आणि दिशा सालियान यांच्या वडिलांची भूमिका याच्याकत काय संबंध असू शकतो? दिशा सालियानच्या वडिलांचं राजकारणाशी काही घेणंदेणं नाही. याप्रकरणात आता सर्व राजकारण्यांनी बाजूला व्हायला पाहिजे, एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, तिची हत्या झाली. आता तिला न्याय मिळाला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे,” अशी भूमिका नितेश राणे यांनी घेतली आहे.