इस्लामपूर : मुख्याधिकाऱ्यांना शहराच्या विकासाचे काहीही देणेघेणे नाही. शहरातील जनतेमध्ये मुख्याधिकाऱ्यांबद्दल प्रचंड असंतोष आहे. इस्लामपूर शहरातील आम्ही मंजूर करून आणलेल्या भुयारी गटार योजनेचे काम मुख्याधिकारी व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अपूरे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराची वाट लावण्यास जबाबदार असल्याचा आरोप विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी सोमनाथ फल्ले, बाळासाहेब पाटील- पलूसकर, निवास पाटील, अर्जुन पाटील, मोहन वळसे, सयाजी जाधव, सिकंदर पटेल उपस्थित होते.
मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी पदभार स्विकारल्यापासून शहरातील विकासकामांना खिळ बसली आहे. भुयारी गटार योजनेवर कोर्टाचा कोणताही स्टे नसताना भुयारी गटार योजनेचे थांबविण्याचे काम त्यांनी केले. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी एस.टी.पी. व पंपिंग स्टेशनच्या कामाचे भूमीपूजनाचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील , खासदार धैर्यशील माने, सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होवूनसूध्दा आजपर्यंत काम सुरु झाले नाही. एसटीपीच्या दोन जागा ताब्यात आहेत.
एक जेसीबी व ३ कामगारांच्या जीवावर भुयारी गटरचे काम पुर्ण होवू शकत नाही. विकासकामांसाठी नागरिकांना मोर्चे काढावे लागले. शहरातील जनता कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करणार नाही. मुख्याधिकाऱ्यांनी शहराच्या विकासाला जाणीवपूर्वक खिळ घातली आहे. त्यांना हटवून अनुभवी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करावी. अन्यथा आगामी काळात शहरातील जनतेचा व मुख्याधिकाऱ्यांचा संघर्ष अटळ आहे.
– विक्रम पाटील, इस्लामपूर
इस्लामपूर नगरपालिकेत सामान्य जनतेची कामे होत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांची भूमिका करतो, पाहतो, पाहू, बघतो अशा उत्तरांनी वेळ मारून नेला जातो. जनतेची कामे होणार नसतील तर त्यांना हटवायला हवे. प्रशासक म्हणून जबाबदारी असताना सामान्य लोकांचीच कामे वेळेवर होतात. ठराविक लोकांची कामे होतात आणि सामान्य लोकांना तासनतास वेटिंगवर बसवले जाते हे दुर्दैवी आहे.
– सनी खराडे, मनसे.
माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या निधीतून इस्लामपूर शहरात चार-पाच ठिकाणी कामे मंजूर करून आणली आहेत. वर्कऑर्डर निघाल्या आहेत असे असले तरी जाणीवपूर्वक विरोधकांची कामे प्रलंबित ठेवण्याचे पाप अधिकारी करीत आहेत.
– मोसिन पटवेकर, रयत संघटना
इस्लामपूर शहरात सध्या अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे यात दुजाभाव केला जात आहे. सामान्य माणसाला वेठीस धरले जात आहे सर्वांना समान न्याय ही भूमिका नाही.
– धनराज पाटील, इस्लामपूर.
मुख्याधिकाऱ्यांची बदली करा, अन्यथा संघर्ष अटळ .!
अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी.अन्यथा राज्यशासनाला जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा विक्रम पाटील यांनी दिला आहे. यावेळी उपस्थित सर्वांनी मुख्याधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीला पूरक भूमिकेवर ताशेरे ओढले.






