जत : दिवाळी सन दोन दिवसावर येऊन ठेपला तरी जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह दिसत नाही. सर्वच व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी विविध वस्तूंनी आपआपली दुकाने सजविली आहेत. परंतु गत वर्षी तालुक्यातील खरिप हंगाम वाया गेल्याने व रब्बीची पेरणी करूनही अद्याप पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाल्याने हजारो उसतोडणी कामगार आपल्या कुटुंबियासह रोजगारासाठी बाहेर पडले आहेत. याचा परिणामबाजारपेठेवर दिसून येत आहे.
जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर कापड दुकानदारांमध्ये जाहीरातींवरून चढाओढ लागली आहे. कापड दुकानदार आपल्या चारचाकी वाहनावर व रिक्षावर एवढेच नव्हेतर आपल्या दुकानांसमोर मोठमोठे स्पीकर बाॅक्स लाऊन आपल्या दुकानाची जाहीरात करताना दिसत आहेत. यामुळे बाजारपेठेत जणू यात्राच सुरू आहे का? याचा भास होत आहे. कापड व्यापाऱ्यांनी सोडलेल्या या स्पीकरच्या आवाजामुळे बाजारातील इतर व्यावसायिक व ग्राहक वैतागले आहेत. एकंदरीत जत बाजार पेठेवर दुष्काळाचे सावट दिसून येत असून व्यापारी चिंतेत आहेत.
साहित्य खरेदी करणारे तुरळक
जत शहरातील पेठेतील हनुमान मंदिर ते महाराणा प्रताप चौक, जयहींद चौक ते मटण मार्केट या मार्गावर व्यापाऱ्यांनी दिवाळीचे स्टाॅल लावले असले तरी दिवाळीचे साहित्य खरेदी करणारे ग्राहक तुरळक प्रमाणात दिसून येत असल्याने व्यापारी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.






