राजगुरूनगर : राजगुरुनगर येथील भीमानदीतीरी श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार (दि. ६) ते गुरुवार (दि. ८) पर्यंत श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या निमित्त मंगळवार (दि. ६) रोजी सकाळी ८ वाजता आभिषेक व महापूजा यजमान नथुराम तनपुरे यांच्या हस्ते करुन उत्सवास सुरुवात झाली. सकाळी १० वाजता गायत्री महायज्ञ, सायंकाळी ५ वाजता प्रेमध्वजाची मिरवणूक काढून समीर आहेर, अविनाश नाणेकर, जेष्ठ गुरुबंधू पांडुरंग साळुंके, रविकाका जोशी, सुहास कुलकर्णी, प्रभाकर जाधव, बाबासाहेब साळुंके व गुरुबंधू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ७) सकाळी श्रींना अभिषेक व महापूजा यजमान समीर आहेर यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच ‘ओम नमः शिवाय’चा अखंड मंत्र जागर करण्यात आला. दुपारी २ वाजता श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन व सायंकाळी ५ वाजता दत्त जन्मावर हभप तान्हाजी बाबर यांचे प्रवचन होऊन श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तदनंतर आरती करून सुंठवडा वाटप करण्यात आले. रात्रौ १० वाजेपर्यंत गुरुबंधुच्या उपस्थितीत श्रींची मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा संपन्न झाली. व रात्री उशीरापर्यंत जागर व संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला.
प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता
गुरुवारी (दि. ८) रोजी दुपारी ३ वाजता श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन व सामुदायिक मंत्रजप होवून सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती होऊन विशाल रामचंद्र घुमटकर यांच्या हस्ते प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता करण्यात आली.
उत्सवासाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष समीर आहेर, कार्याध्यक्ष रविंद्र जोशी, उपाध्यक्ष बाबासाहेब साळुंके, सचिव नथुराम तनपुरे, खजिनदार हनुमंत सैद, प्रकाश तेंडोलकर, प्रभाकर जाधव, पांडुरंग साळुंके, अविनाश नाणेकर, माणिक तनपुरे यांनी केले होते. तर नारायण जाधव, भीमाशंकर तारू, प्रवीण शेट्ये, ऍड. गणेश होनराव, मंदार पिसाळ, शरद चोपडे, कमल पिसाळ, कुसुम तनपुरे, जनाबाई सैद, महादेव पाटील आणि त्यांचे सहकारी आदी गुरू बंधूं- भगिनींच्या सहकार्याने उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.