Talathi office computerization: तलाठी कार्यालयाच्या फेऱ्यांना पूर्णविराम; सातबारावरील ११ कामे आता ऑनलाइन
Satbara 7 12 mutation online: सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे अथवा कमी करणे यांसारख्या विविध महसुली कामांसाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. भूमिअभिलेख विभागाने विकसित केलेल्या ‘ई-हक्क’ ऑनलाइन प्रणालीद्वारे नागरिक घरबसल्या अर्ज दाखल करू शकणार आहेत.
फेरफार नोंदविण्यासाठी यापूर्वी नागरिकांना तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता. तलाठी संबंधित फेरफार नोंदवून ती मंजुरीसाठी मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवत असत. मात्र, काही ठिकाणी फेरफार नोंदविण्यास किंवा मंजुरी देण्यास होणारा विलंब नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता. नियमांनुसार कोणतीही हरकत अथवा वाद नसल्यास फेरफार व मंजुरीची प्रक्रिया एका महिन्याच्या आत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ई-हक्क प्रणालीचा शंभर टक्के वापर बंधनकारक केला आहे. अर्जासोबतची कागदपत्रे अपूर्ण असली तरी तलाठ्यांना अर्ज थेट नामंजूर करता येणार नाही. अशा वेळी सातबाऱ्यावर नोंद घेऊन अर्जदाराला आवश्यक कागदपत्रांबाबत लेखी सूचना देत प्रकरण पुढील निर्णयासाठी मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागणार आहे. तसेच ऑनलाइन अर्ज अनावश्यकपणे प्रलंबित राहणार नाहीत, याची जबाबदारी महसूल प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.
अनोंदणीकृत फेरफार नोंदींसाठी ई-हक्क प्रणालीद्वारेच अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. एखादा खातेदार लेखी अर्ज घेऊन आल्यास त्यालाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास मार्गदर्शन केले जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयांमध्ये स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
वारस नोंद, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, गहाणखत नोंदविणे, बोजा कमी करणे, ई-करार नोंद, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब व्यवस्थापक नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव बदलणे, हस्तलिखित व संगणकीकृत ७/१२ मधील तफावत किंवा चुका दुरुस्त करणे तसेच मयत कुळाच्या वारसांची नोंद या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ई-हक्क प्रणालीमुळे महसूल विभागाच्या सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येणार असून नागरिकांचा वेळ, श्रम आणि कार्यालयीन फेऱ्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.






