मुंबई : कोविड सेंटर (Covid Center) घोटाळा प्रकरणावरुन राजकारण तापण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईत कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) 15 ठिकाणी धाडी घातल्या आहेत. त्यात सनदी अधिकारी आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, आदित्य शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावरही धाडी टाकण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
का घालण्यात आल्या धाडी?
कोविडच्या काळात मुंबई महापालिकेच्या वेळी काही कंत्राट दिले होते. त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ही ईडीची छापेमारी करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. महापालिकेचे तत्कालीन अधिकारी ज्यांच्याकडून या कोविड प्रकरणाच्या फाईल्स गेल्या. त्यांच्याकडे ही छापेमारी सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. जैस्वाल यांच्या खात्याच्या वतीनं काही कंत्राटं आणि फाईल्सना मंजुरी देण्यात आली होती. त्याबाबत या छापेमारीत चौकशी करण्यात येतेय.
छाप्यानंतर काय म्हणालेत किरीट सोमय्या?
संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर, त्यांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस, त्यांचे जोडीदार यांच्याकडे ईडीनं छापे टाकलेले आहेत, अशी बातमी मीडियात आलेली आहे. या सगळ्याचा हिशोब तर द्यावाच लागणार आहे, असं सांगत किरीट सोमय्यांनी ठाकरे गटावर टीका केली.