जळगाव : गेल्या 30 वर्षांपासून आमदार असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘आतापर्यंत दहा वेळा काँग्रेसने रावेर लोकसभेसाठी उमेदवार दिला. मात्र, एक वेळचा अपवाद वगळता अनेकदा लाखोंच्या मताने या मतदारसंघात उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे आघाडीने राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यास व आपल्याला उमेदवारी मिळाल्यास निश्चितपणे रावेर लोकसभेची जागा ताकदीने लढवू व विजयी होवू, असे सूतोवाच खडसे यांनी केले.
पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस 1990 पासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. सुमारे 10 निवडणुकांनंतर काँग्रेस ही जागा लढवत आहे. तेरा महिन्यांत एक निवडणूक वगळली तर काँग्रेसला येथे यश मिळालेले नाही. त्यामुळे काँग्रेस उमेदवार येथे लाखो मतांच्या फरकाने पराभूत झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास व पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास आपण या जागेवर ताकदीने निवडणूक लढवणार आहोत.
रावेर लोकसभेत ‘एल फॅक्टर’ची जादू
याशिवाय, भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. रावेर लोकसभेत सर्वाधिक लेवा समाज व मराठा समाजाचे प्राबल्य आहे. आमदार एकनाथराव खडसेंचा लेवा समाजावर प्रभाव असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्गही येथे आहे. त्यामुळे आघाडीच्या बैठकीत ही जागा कुणाला सुटते त्यावर यशापयशाची गणिते अवलंबून आहेत.