बनावट लॅबोरेटरी रिपोर्टचा वडूजमध्ये धक्कादायक प्रकार उघड; डॉक्टरांचे नाव, सहीचा सर्रास दुरुपयोग
कराड : वडूज (ता. खटाव) येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत नसतानाही एका डॉक्टरच्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करून पाच रुग्णांचे बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित हॉस्पिटलमधील लॅबोरेटरीचे चालक, तंत्रज्ञ व प्रशासनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार डॉ. संदीप मोहनराव यादव (वय ५२, रा. बनपुरीकर कॉलनी, कराड) यांनी दिली. या प्रकरणाचा तपास वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कराड शहर पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. यादव यांची २००६ पासून कराड येथे पॅथॉलॉजी लॅब आहे. त्यांना २७ सप्टेंबर २०२५ रोजी एका विमा कंपनीच्या डॉ. मोना लंबोदर यांचा फोन आला. त्यांनी वडूज येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या पाच रुग्णांचे रिपोर्ट डॉक्टरांच्या मेलवर पाठवले, त्या रिपोर्टवर डॉक्टरांचे नाव आहे.
लंबोदर यांनी रुग्णाचे नमुने तपासून ते चाचणी अहवाल तुम्ही स्वतः प्रमाणित केले आहेत का? अशी विचारणा डॉ. यादव यांना केली. त्यावर सौरभ कोकरे, हेमंत देवकर, महेश यादव, केशर वाघमोडे, प्रतिक कदम या पाच रुग्णाचे लॅबोरेटरी रिपोर्टचे डॉ. यादव यांनी अवलोकन केल्यावर त्यांना त्या रिपोर्टवर त्यांचे नाव असलेले शिक्के मारून, त्यावर त्यांची खोटी सही करुन वेगवेगळ्या तारखांचे रिपोर्ट सादर केल्याचे निदर्शनास आले. त्याच रिपोर्टवर दुसऱ्या बाजूला रुग्णालयाचा शिक्का मारून त्यावर सही केल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत नसून, ते रिपोर्ट मी प्रमाणित केले नसल्याचे त्यांनी डॉ. मोना लंबोदर यांना सांगितले.
बनावट सही, शिक्का मारल्याचे समोर
सदर लॅबोरेटरी चालकाने माझे नाव, नोंदणी क्रमांक यांचा शिक्का तयार करून, माझी खोटी सही करुन बनावट रिपोर्ट तयार करुन ते खरे असल्याचे भासवून वापरात आणून माझी व संबंधित रुग्णांची फसवणूक केली आहे. त्यावरुन २७ सप्टेंबर २०२५ पूर्वी वेगवेगळ्या तारखांना मी हॉस्पिटलमधील पॅथोलॉजीमध्ये कार्यरत नसताना, माझ्या नावाचा आणि सहीचा दुरुपयोग करून पाच रुग्णांना बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट तयार करुन ते रिपोर्ट पॅथोलॉजीस्टनी प्रमाणित केल्याचे भासवत माझी व संबंधित रुग्णांची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित हॉस्पिटल प्रशासनाच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार असल्याची फिर्याद डॉ. यादव यांनी दिली आहे.