सौजन्य - नवराष्ट्र टीम
नीरा : पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरा येथील मुख्य बाजारात आज झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा ३२६० असा विक्रमी भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे व चांगला भाव मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी दर शनिवारी नीरा येथे भरणाऱ्या लिलावाच्या वेळी आपला कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेली अनेक वर्ष बंद पडलेला नीरा येथील कांदा बाजार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री झाली होती. यावर्षी देखील आता कांद्याची आवक नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली असून, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. आज शनिवारी दुपारी एक वाजता नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव पार पडले. यावेळी कांद्याला शेकडा तीन हजार ते बत्तीशे पन्नास इतका भाव मिळाला, अशी माहिती निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे यांनी माध्यमांना दिली आहे. आज नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २१० पिशवी कांद्याची आवक झाली होती.
कांदा नायलॉनच्या पिशवीमध्ये आणू नका; व्यापाऱ्यांचे आवाहन
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणताना तो नायलॉनच्या पिशवीमध्ये आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याऐवजी पारंपारिक सुतळीची नवीन पिशवी कांद्यासाठी वापरावी, असे आवाहन व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. तर सुतळीची पिशवी वापरल्याने कांदा चांगला राहतो, त्याची साल निघत नाही. त्यामुळे तो दिसायला चांगला दिसतो. याउलट नायलॉनच्या पिशवीमध्ये कांदा आणल्यास कांद्याची साल निघते, त्यामुळे कांदा दिसायला खराब दिसतो. परिणामी दरामध्ये फरक पडतो. असे व्यापाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
सर्व प्रकारचे अन्न जसे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, तसेच कांदा आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो. कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींच्या उत्पादनास प्रोत्साहित करण्यास मदत करते, जे संक्रमण आणि रोगांशी लढतात. कच्चा कांदा खाल्ल्यास सर्दी, फ्लू आणि श्वसनाच्या इतर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.