तासगाव : जून महिन्याचे तीन आठवडे कोरडे गेल्यामुळे सर्वांना मोसमी पावसाचे (Monsoon Rain) वेध लागले होते. सांगली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होता. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पावसाने (Rain News) काही भागात हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामाला वेग आला आहे. या पावसामुळे तासगांव तालुक्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मृग नक्षत्राला सुरुवात होताच मोसमी पाऊस राज्यात धकडतो. मात्र, यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पाऊस आला नाही. जून महिन्यांचे चार आठवडे लोटले तरी पावसाचा पत्ता नव्हता. पावसाअभावी हायब्रीड , सोयाबीन, मूग, मका पेरण्या लांबल्या होत्या. तासगांव तालुक्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत तापमानात प्रचंड वाढ होऊन ४५ अंशापर्यंत गेले. त्यामुळे प्रचंड उन्ह व उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
अशातच 24 जूनपासून जिल्हाभरात हलक्या व मध्यम सरींचा पावसाने हजेरी लावली. दोन ते तीन दिवस रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, बळीराजाला जोरदार पाऊसाची प्रतीक्षा आहे. अशातच सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. सोयाबीन, मका व हायब्रीड पिकांची लागवड करण्याची लगबग सुरू झाली आहे.