FDA ची पुन्हा मोठी कारवाई; कराडातील दोन हॉटेल्सना तात्पुरते बंदचे आदेश
कराड : शहरातील हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, याची अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी अचानक तपासणी केली. या कारवाईत दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य थंड पेयाची विक्री होत असल्याचे आढळून आले, तर काही खाद्यपदार्थ संशयास्पद आढळल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या दोन हॉटेल्सना पुढील आदेश होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्य तीन हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.
दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलवर कराड शहरातील काही हॉटेल्सविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सहाय्यक आयुक्त शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर व पथकाने शहरातील संबंधित हॉटेल्सची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य थंड पेय आढळून आले.
तसेच काही खाद्यपदार्थ संशयास्पद आढळल्याने त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपासणीच्या निष्कर्षानुसार संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, तासवडे एमआयडीसी परिसरात पॅकिंगवर आवश्यक माहिती नमूद न करता गुळाचे पॅकिंग करून तो अन्यत्र पाठवला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी केली. या कारवाईत सुमारे तीन लाख रुपये किमतीचा गूळ सील करण्यात आला.
हॉटेल्समधील तपासणी तसेच तासवडे एमआयडीसीतील गुळावरील कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पॅकिंगवरील आवश्यक माहिती याबाबत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तालयाच्या भेसळखोरांविरोधातील धडक कारवाईमुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीला मोठा आळा बसत असल्याचे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून ब्रँडेड दूध, पॅकबंद पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ग्राहकांच्या वाढत्या जागरूकतेमुळे हॉटेलांमध्येही अनॉलॉग चीजऐवजी शुद्ध पनीर वापरण्याकडे कल वाढला आहे.






