निगडी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक महासंघचे शहराध्यक्ष काशिनाथ जगताप व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष वैभव छाजेड यांनी दिला आहे.
या संदर्भात छाजेड आणि जगताप यांनी महापालिकेकडे नुकतेच निवेदन दिले. यावेळी दत्ता घुले, प्रभाकर कळमकर, किरण नेवाळे, युवराज पवार, कविता आल्हाट, इमरान शेख, विजय घोडके आदी कार्यकते उपस्थित होते. पूर्णानगर -शाहूनगर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नुकताच एक बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते खड्डे मुक्त करावेत. जर या मागणीचा विचार केला गेला नाही, तर महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैभव छाजेड यांनी दिला. दरम्यान, पंधरा दिवसात शहर खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती छाजेड यांनी दिली.
[blockquote content=”रस्त्यांच्या दुरवस्थेला महापालिका जबाबदार आहे. खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास मृत्यू झाल्यास अथवा कुणी जखमी झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे आतापर्यंत जे मृत्यू झाले त्यांचा वारसांना आणि जखमींना महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी.” pic=”” name=”- काशिनाथ जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी वाहतूक महासंघ.”]