मयुर फडके, मुंबई : मूळ गुन्हाच रद्दबातल झाल्यास त्याआधारे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ED) तक्रार (ECIR) नोंदवू शकत नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने (High Court) जेट एअरवेजचे प्रवर्तक नरेश गोयल (Naresh Goyal, the promoter of Jet Airways) आणि त्यांच्या पत्नी अनिता (Wife Anita) यांच्याविरोधात ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द केली (ED canceled the complaint registered against him).
फसवणुकीच्या आर्थिक फौजदारी फिर्याद प्रकरणात जेट एअरवेजचे प्रवर्तक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता यांनी त्यांच्याविरोधात ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली होती. गुरुवारी न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने गोयल दांपत्यांची मागणी मान्य केली. मूळ गुन्हा बंद करण्याबाबतचा अहवाल न्यायालयाने स्वीकारल्यास ईडीने दाखल केलेला ईसीआयआर टिकू शकणार नाही, ही बाब ईडीच्या वतीने गुरुवारी मान्य करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात काहीच उरलेले नसल्याचेही स्पष्ट करून खंडपीठाने गोयल दाम्पत्याविरोधातील ईडीचे प्रकरण रद्द केले.
ईसीआयआर खासगी कागदपत्र असल्यामुळे तो रद्द करता येऊ शकत नसल्याचा दावा ईडीचे वकील हितेन वेणेगावकर आणि श्रीराम शिरसाट यांनी मागीलसुनावणीदरम्यान केला होता. तसेच ईसीआयआर आणि तपास यंत्रणेने नोंदवलेल्या प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) तुलना होऊ शकत नाही, असेही वेणेगावकर यांनी सांगितले होते. मात्र, ईडीच्या युक्तिवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ईसीआयआर रद्द होऊ शकत नसल्याचे ईडीचे वक्तव्य गंभीर आहे. मूळ गुन्हा रद्द झाला असेल किंवा अस्तित्त्वात नसेल, तर ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द का होऊ शकत ? मूळ गुन्ह्याशिवाय ईसीआयआर कसा काय टिकेल ? अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने ईडीला केली होती.
थेट गुन्हा नोंदवण्याचा अधिकार नाही. गोयल दांपत्यांविरोधात २०१८ मध्ये मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याआधारावर ईडीने तक्रार नोंदवली होती. पुढे, मार्च २०२० मध्ये मुबंई पोलिसांनी गोयल यांच्याविरोधातील तक्रारीत तथ्य नसल्याचे नमूद करून प्रकरण बंद करण्याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयात सादर केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून गोयल यांच्याविरोधातील प्रकरण टिकू शकत नाही, असा दावा गोयल यांच्यावतीने करण्यात आला.