सौजन्य - नवराष्ट्र टीम
सातारा : सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे पर्यटन विभागाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून तीन दिवसीय पर्यटन महोत्सव भरवण्यात आला. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली दरम्यान कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री यांचा ताफा पोहचताचं यावेळी एका गाडीच्या धक्क्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या गाडीवर कमान पडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे महाबळेश्वर महोत्सवातील ढिसाळ नियोजन असल्याचे खुद्द जिल्हाधिकारी यांना अनुभवायला मिळाले.
महाबळेश्वर देशातील उत्तम पर्यटनस्थळ
महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असून त्याचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्याची गरज आहे. महाबळेश्वर हे नवे गिरीस्थान म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पर्यटनाच्या क्षेत्रातील स्कुबा डायव्हिंगसारख्या नव्या कल्पना पुढे आणून राज्यातील पर्यटनाला चालना देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोयना बॅकवॉटर संबंधी असणारी बंधने दूर केल्याने तेथे चांगली पर्यटन व्यवस्था उभी राहत आहे. पुढील महापर्यटन उत्सव कोयना बॅकवॉटर क्षेत्रात घेण्यात येईल व पर्यटकांना या भागातील निसर्ग सौंदर्याचा आणि जल क्रीडांचा अनुभव घडविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पर्यटनामुळे रोजगार निर्मितीला चालना
उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आल्यावर रोजगार निर्माण होतात, मात्र पर्यटन क्षेत्रात कमी गुंतवणूकीत अधिक रोजगार निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. पर्यटन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. राज्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे कार्य पुढील ५ वर्षात करण्यात येईल, असंही फडणवीस म्हणाले.