लाखांदूर : पाच महिन्यांपूर्वी तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. त्यानंतर आता पुन्हा दोन दिवसांपूर्वी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तिचे अपहरण करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून दिघोरी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध अत्याचार, प्राणघातक हल्ल्यासह पॉक्सो कायद्यांत[blurb content=””]र्गत गुन्हा दाखल केला आहे.
यातील पहिली घटना 14 जुलै तर दुसरी 12 डिसेंबरला घडली. सम्यक पुरुषोत्तम मेश्राम (19, रा. बोर टोला, अर्जुनी मोरगाव), प्रज्वल सांगोळे (20, रा. चान्ना) व अमित खोब्रागडे (वय 21, रा. बाकटी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्यक मेश्राम याने पाच महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मात्र, धमकी व भीतीमुळे तिने वाच्यता केली नाही. त्यामुळे सम्यकचे धाडस वाढले. त्याने दोन दिवसांपूर्वी आपल्या दोन मित्रांच्या मदतीने पीडितेला शाळेत जात असताना बळजबरीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण करून बेदम मारहाण केली. यानंतर तिला परत सोडण्यात आले.
या घटनेने घाबरलेल्या या अल्पवयीन मुलीने आपले गाव गाठून 5 महिन्यांपूर्वी सम्यक याने केलेल्या अत्याचाराची आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपहरण व मारहाणीच्या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. पीडितेच्या आईने तात्काळ दिघोरी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी सम्यक मेश्राम याला अटक करण्यात आली. अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत.