नारायणगाव : एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनचा कर्मचारी पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८ वर्ष, रा. आकाशगंगा कॉलनी, आळेफाटा ता. जुन्नर) या पोलीस कर्मचाऱ्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल (Narayangaon Crime) करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली. हा पोलीस कर्मचारी गैरकृत्य करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे ही घटना उघडकीस आली.
खाकी वर्दीतल्याच जबाबदार व्यक्तीने अशाप्रकारे अन्याय केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनेची दखल घेऊन आरोपीला सेवेतून तात्काळ निलंबित करावे, अन्यथा नारायणगाव पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा काढू, असा इशारा येथील महिला संघटनांनी दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि. २) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येडगाव कोल्हे मळा रस्त्याने खाजगी क्लासमधून पायी घरी चालली होती. आरोपी नारायण बर्डे याने ‘तुला शंभर रुपये देतो, मोटरसायकलवर बस’ असा आग्रह धरला. मात्र, मुलीने नकार दिल्याने त्याने मुलीसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. घरी जाऊन मुलगी रडू लागली व तिने घटनेची माहिती आपल्या आजीला सांगितली.
सीसीटीव्हीच्या आधारे मुलीच्या पालकांनी आरोपीचा तात्काळ शोध घेतला असता त्याच परिसरात हा आरोपी आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला चांगलाच चोप देण्यात आला आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.