पिरंगुट घाटामध्ये चाले (ता. मुळशी) येथून स्वारगेट (पुणे) येथे वर्हाड घेऊन जाणार्या खासगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
पुणे : पिरंगुट घाटामध्ये चाले (ता. मुळशी) येथून स्वारगेट (पुणे) येथे वर्हाड घेऊन जाणार्या खासगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. बसमधील एका महिलेला धूर येत असल्याचे लक्षात आल्याने तिने प्रसंगावधान राखत चालकास माहिती दिली. त्यामुळे वेळीच सर्व वर्हाडी बसमधून खाली उतरले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली.
चाले येथील लग्नकार्य उरकून वर्हाडी मंडळींना घेऊन खासगी बस स्वारगेट (पुणे) च्या दिशेने जात होती. बसमध्ये जवळपास २० जण होते. त्यामध्ये लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. रात्री १० वाजता बस पिरंगुट घाटातून वर आली असता शेवटच्या टप्प्यावर म्हसोबा मंदिरासमोर बसच्या इंजिनमधून अचानक दूर येऊ लागला.
यावेळी बसमधील वैशाली भानुदास सुतार (रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांना धूर दिसून आला. त्यांनी प्रसंगावधान राखत ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे चालकाने देखील तातडीने सर्व वर्हाडींना बसमधून खाली उतरवले आणि काही मिनिटांतच बसला आगीने घेरले.
घाटात वाहतूक कोंडी
बस जळून खाक झाल्यानंतर अग्निशामक दलाचा बंब आला. जवानांनी आग आटोक्यात आणली. ‘वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता,’ अशी भावना या अपघातातून बचावलेल्या वर्हाडी मंडळींनी व्यक्त केली. या वेळी घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. काही स्थानिक युवकांनी वाहतूक नियंत्रित केली. दरम्यान जळालेली ही बस स्कूल बस असल्याची माहिती बसमधील काही जणांनी तसेच प्रत्यक्षदर्शी यांनी दिली.
Web Title: Fire at bus la pirangut ghat disaster was averted as the woman in the bus kept a watchful eye nrdm