सौजन्य - नवराष्ट्र टीम
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आलेले अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. कोरोना काळात त्यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीचा निधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दृष्टी दर्शवतो.
विधानपरिषद उपसभापतीपदाच्या काळात विविध समित्या व सभागृहाच्या कामकाजात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती व विकास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार हे उत्तम संसदपटू होते आणि विधानपरिषदेत त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना व सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीला धक्का
पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला दिशा देणारे, प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास करून निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून अजित पवार यांची ओळख होती. सहकार क्षेत्रातील नाते, भूषण वर्ष असो वा इतर कोणताही काळ-सहकारातील प्रत्येक विषयाची त्यांना सखोल जाण होती. साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, यंत्रमाग संस्था, कापड उद्योग अशा विविध क्षेत्रांशी त्यांनी जवळीक साधली होती. केवळ वरवरचा आढावा न घेता, प्रत्येक संस्थेतील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात पवार काका-पुतण्याचे (शरद पवार व अजित पवार) योगदान कोणालाही विसरता येणार नाही. शरद पवार यांनी सहकार चळवळीला व्यापक दृष्टी आणि राष्ट्रीय ओळख दिली, तर अजित पवार यांनी त्या चळवळीला गतिमान प्रशासन, आर्थिक बळ आणि ठोस निर्णयक्षमतेची जोड दिली. या दोघांच्या नेतृत्वामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी बँका, सूतगिरण्या आणि इतर संस्था केवळ टिकून राहिल्या नाहीत, तर अनेक ठिकाणी त्यांनी प्रगतीची वाटही पकडली.






