हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त अजित पवार २५ जानेवारी रोजी नांदेडला शेवटचा दौरा केला (फोटो - एक्स)
Ajit Pawar Passed Away : नांदेड : २८ जानेवारी रोजी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त नांदेडला धडकताच सर्वांना धक्का बसला. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह अनेकजणांनी धाय मोकलून रडत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त अजित पवार २५ जानेवारी रोजी नांदेडला आलेले होते. त्यांची कार्यक्रमाला उपस्थिती ही नांदेडसाठी शेवटचा दौरा ठरला.
नियोजित वेळेनुसार २५ जानेवारी रोजी दुपारी अजित पवार स्वंतत्र विमानाने नांदेडला आलेले होते. सुरुवातीला त्यांनी गुरुद्वारा येथे जाऊन संत श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मोदी मैदान येथे आयोजित श्री गुरु तेज बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी दिनानिमित्त व श्री गुरुगोबिंघजी महाराज यांच्या ३५० व्या गुरू ता गद्दी शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित हिंद दी चादर कार्यक्रमास त्यांची उपस्थिती होती.
हे देखील वाचा : UGC च्या नव्या नियमांना स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्रचे उप मुख्यमंत्री पवन कल्याण, दिल्लीचे मंत्री सीरसा, महाराष्ट्राचे विविध मंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात भाषण करून सायंकाळी ५.३० च्या दरम्यान त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले. अजित पवारांचा हा दौरा नांदेडकरांसाठी किंबहुना मराठवाड्यासाठी शेवटचा ठरला.
उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामिमित्त अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अश्रू आवरता आले नाही. हुंदके देत त्यांनी आपल्या अश्रूना मोकळी वाट करून दिली. दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान ते बारामतीकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासोबत माजी आमदार मोहन हंबर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांचीही उपस्थिती होती.
आधार वड कोसळला – पाटील चिखलीकर
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, दादा गेले, हे कळताच धक्का बसला. या घटनेवर विश्वास बसला नाही. टी. व्ही. पाहिला आकाशच कोसळले. विलासराव देशमुख गेल्यानंतर राजकीयदृष्ट्या पोरका झालेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आश्रय देणारा पहिला नेता अजितदादा होते. त्यानंतर दुसऱ्यांदा राजकीय अडचणीच्या काळात विधानसभेची उमेदवारी देवून राष्ट्रवादीचा आमदार केले. कडक शिस्तीच्या दादांच मन मेनापेक्षा मऊ असल्याचा अनुभव घेतला आहे. दादा अचानक गेले, माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आधारवड कोसळला, अशा भावना त्यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : अजित पवारांना अखेरचा निरोप! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल
नाळ जुळलेले नेते – आमदार श्रीजया चव्हाण
–
भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व 66 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अविश्वसनीय व वेदनादायी आहे. तीनच दिवसांपूर्वी नांदेडला त्यांची भेट झाली, संवाद झाला. अजितदादा पवार है जमिनीशी नाळ जुळलेले नेते होते. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांची सखोल जाण होती, प्रश्न मार्गी लावण्याची क्षमता होती. प्रशासनावर प्रभुत्व होते, उत्तम वक्तृत्व शशैली होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाला मदत करण्याच्या भूमिकेतून काम करणारे ते नेते होते, अशा भावना श्रीजया चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.






