महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: वनांमध्ये विशिष्ट वयापर्यंत वाढलेल्या झाडांच्या परिसरात मेढ्यांना चरण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. तसेच अशा प्रकरणी कोणत्याही मेंढपाळांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मेंढपाळांना वनांमध्ये चराईसाठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी गणेश नाईक यांनी वरील सूचना केल्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आदी यावेळी उपस्थित होते.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, पावसाळ्याच्या चार महिन्यात वन क्षेत्रात लहान झाडे असलेल्या ठिकाणी मेंढ्यांना चारण्यास बंदी आहे. मात्र, मेंढपाळांची मागणी लक्षात घेऊन नियमांनुसार विशिष्ट वयाची वाढलेली झाडे असलेल्या क्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी परवानगी देण्यात आली असून यासंबंधीच्या सूचना सर्व वन अधिकाऱ्यांना देण्यात येतील. तसेच वन क्षेत्रात मेंढ्या चराईप्रकरणी कोणाविरूद्धही चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात येतील. पावसाळ्याच्या कालावधीत शेळ्या मेंढ्यांना चराईसाठी फिरावे लागू नये, यासाठी शासकीय जागा, गायरान जमिनी तसेच जमिनी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वनक्षेत्राच्या बफर क्षेत्रात वन्यजीवांचा शेतीला होणारा त्रास कमी करण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतजमिनी भाडेतत्वावर घेऊन तेथे सोलर प्रकल्प उभारण्याचा शासन विचार करत आहे. यामुळे सौर ऊर्जा निर्मितीबरोबरच शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळणार आहे. तसेच वन विभागाने वनक्षेत्रात गवत कुरण तयार करण्यावर भर द्यावा. माजी आमदार बच्चू कडू यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानाची भरपाई दुप्पट करावी. तसेच ती वेळेत द्यावी, अशी मागणी केली.
गणेश नाईक यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
महायुतीमधील अंतर्गत राजकारणाबाबत सातत्याने चर्चा होत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय मागे घेतल्याबाबतची बातमी कधी समोर येते, तर कधी एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेरण्यासाठी भाजपकडून मंत्री गणेश नाईक यांना ताकद दिली जात असल्याची चर्चा होते.
Ganesh Naik : ‘ठाण्यात सर्वात सिनीयर मंत्री मीच’, गणेश नाईक यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची सातत्याने चर्चा रंगते. विशेष म्हणजे गणेश नाईक यांनी आज आपल्या भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरुन पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे. “ठाण्यात सर्वात जास्त सिनीयर मंत्री मी आहे”, असं गणेश नाईक यांनी भिवंडी येथील कार्यक्रमात उघडपणे म्हटलं आहे. त्यांच्या य वक्तव्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.