कल्याण-डोंबिवली : कल्याण डोेंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी वर्गाचा भरणा आहे. प्रशासकीय राजवट आहे. आम्ही नगरसेवक नसलो तरी नागरीकांना ते माहिती नाही. त्यांच्याकडून विकास कामांबाबत आम्हालाच विचारणा होते. विकास कामे होत नाही. त्याचे कारण आमच्या पक्षाच्या नेत्यांचा अधिकारी वर्गावर वचक राहिलेला नाही. आम्ही अधिकाऱ्यांना बोलू शकत नाही. कारण आम्ही आत्ता नगरसेवक नाहीत. लोकाची विकास कामे होत नसल्याने मी स्वत:हून पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी व त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजपच्या पक्ष सदस्य पदाचा राजीनामा दिला. राजीनामा का दिला याविषयी विकास म्हात्रे यांनी हा खुलासा केला. महापलिकेच्या अधिकाऱ्यांवर प्रत्येक प्रभागाची माहिती होती. प्रत्येक प्रभागातील मूलभूत सोयी सुविधांची जाण होती. प्रत्येक प्रभागात विकास कामांचा हेड टाकल्यावर ते त्यांना कळत होते. आता प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी यात लक्ष घालत नाहीत. ते केवळ ट्रेनिंग करतात. या ठिकाणी शिकतात. त्यानंतर ते निघून जातात. गेल्या ३ वर्षात काय विकास झाला आहे. माझ्याच प्रभागात नाही. तर महापालिका ह्द्दीतील अनेक प्रभागात विकासच थांबला आहे. त्यामुळे कुठे तरी मला वाटते की, आमच्या पक्षाचे नेते त्यांचा वचक कमी झाला आहे.
पुढे ते म्हणाले, आम्ही त्यांना त्रास देण्यापेक्षा संबंध चांगले ठेवण्याकरीता मी हा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आम्ही बोलू शकत नाही. आम्ही नगरसेवक नसल्याने आमची ती पॉवर नाही. नेत्यांनी बोलले तर फरक पडू शकतो. नेत्यांना आम्ही सांगत असतो. पण नेत्यांनाही कुठे काही विचारण्यास त्रास होत असावा असे मला वाटते. लोकांची विकास कामे होत नसल्याने मी राजीनामा दिला आहे असे म्हात्रे यांनी सांगितले.