File Photo l Crime
वणी : निवडणूक अधिकाऱ्यांकडे (Election Officer) तक्रार व सीसीटीव्ही फुटेज दिल्याच्या कारणावरुन वाद घालत चौघांनी एकावर कोयता व लोखंडी रॉडने हल्ला (Attack on Youth) केला. याबाबत तक्रारीवरुन चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुधाकर उर्फ विशाल यशवंत वारुळे (रा. मोदकेश्वर सदन, कलानगर, आकाश पेट्रोलपंपाचे मागे, दिंडोरी रोड) हे राशेगाव गावातून नाशिक बाजूकडे दुचाकीने जात असताना संतोष उर्फ नंदू शंकर साळवे (रा. गंगापूररोड, नाशिक), राजाराम उर्फ राजू भिमाजी अपसुंदे, बालाजी साहेबराव पवार, शंकर पांडुरंग बेंडकुळे यांनी दुचाकी आडवी लावून वारुळे यांची वाट अडविली. आमच्याविरोधात ११२ ला फोन का केला? तसेच विरोधात निवडणूक अधिकारी यांना तक्रार अर्ज व सीसीटीव्ही फुटेज का दिले, अशी विचारणा केली व जिवे मारण्याची धमकी देत ‘त्या दिवशी तू वाचला. आज तुझा काटाच काढतो’ असा दम दिला.
तसेच संशयित एक व दोन यांनी हातातील कोयत्याने अंगावर वार करुन जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. संशयित तीन व चार यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. संशयितांनी लाथ मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद वारुळे यांनी दिल्याने दिंडोरी पोलिसांनी नमूद चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे करत आहेत.