फोटो सौजन्य - Social Media
डोणगावच्या आठवडी बाजार परिसरात, महामार्गालगत व ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, तब्बल १२० च्या आसपास व्यापारी गाळे उभारण्यात आले होते. बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वानुसार या गाळ्यांचा खर्च, देखभाल, दुरुस्ती ही २०३३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची जबाबदारी ठरवण्यात आली होती. नियमानुसार ग्रामपंचायतीचा या खर्चाशी काहीही संबंध नाही. मात्र, तक्राऱ्यांनुसार ग्रामपंचायतीने सर्व नियमांकडे दुर्लक्ष करत पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त गावविकास निधीतून तब्बल ₹६ लाख ४७ हजार खर्च केले.
हा निधी गावाच्या कृती आराखड्यानुसार मूलभूत विकासकामांसाठी वापरला जाणे अपेक्षित होते. परंतु, गावाच्या विकासासाठी असलेला हा निधी ठेकेदाराने करावयाच्या कामांवर खर्च करण्यात आल्याचा आरोप शैलेश सावजी यांनी केला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली होती. तक्रारीनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत मेहकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तेजस गवई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डोणगाव ग्रामपंचायतीत भेट दिली. त्यांनी या प्रकरणासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच संबंधित कागदपत्रांची पाहणी केली. खर्चाचे विवरण, मंजुरी प्रक्रिया आणि BOT करारातील अटींची पडताळणीही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या चौकशीदरम्यान ग्रामपंचायतीने नेमका कोणत्या कारणास्तव ठेकेदाराची जबाबदारी स्वतःवर घेतली? आणि नियमांकडे दुर्लक्ष करून वित्त आयोगातील निधीच का वापरला? असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला. स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे मोठी चर्चा रंगली आहे. ग्रामपंचायतीने विकास निधीचा वापर नियमबाह्यपणे केल्यास त्यावर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तक्रारदार शैलेश सावजी यांनी सांगितले की, “ठेकेदाराच्या जबाबदारीतील कामांसाठी ग्रामपंचायतीने गावविकास निधी खर्च करणे ही मोठी अनियमितता आहे. निधी कुठे आणि कसा खर्च झाला याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.” दरम्यान, विस्तार अधिकारी तेजस गवई यांचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल.






