नायगावमध्ये १,००० कोटींचा जमीन घोटाळा उघड: दिग्गज बांधकाम व्यावसायिकांसह महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
‘धनश्री डेव्हलपर्स प्रा. लि.’चे संचालक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शंकरराव अंबऋषी बोरकर (६६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, २००८ पासून आरोपी हेमंत पाटील आणि धर्मेश शहा यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र, नायगाव (पूर्व) येथील मौजे टिवरी येथील ६५.३३ एकर जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून ती बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४,००० रुपये खात्यात जमा होणार, कसं ते जाणून घ्या…
तक्रारीत नमूद केल्यानुसार, जमिनीचे रितसर ७/१२ उतारे, नोंदणीकृत खरेदीखत आणि साठेकरार अस्तित्वात होते. कालबाह्य आणि रद्द झालेल्या ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’चा वापर करण्यात आला. बिगर-नोंदणीकृत (Non-registered) कागदपत्रांच्या आधारे अनेक सर्व्हे नंबरच्या जमिनी परस्पर विकल्या गेल्या. फिर्यादींच्या संमतीशिवाय DDPL Global Pvt. Ltd. आणि Unicorn Inca & Estate Pvt. Ltd. या कंपन्यांच्या नावावर जमिनीची खोटी नोंदणी करण्यात आली.
या मोठ्या घोटाळ्यात केवळ खाजगी व्यक्तीच नव्हे, तर सरकारी यंत्रणेवरही ठपका ठेवण्यात आला आहे. वसई-२ निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्यांनी महसुली नियमांचे उल्लंघन करून आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नायगाव पोलीस ठाण्यात हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२), ३३८ आणि ३४ नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने आगामी काळात अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले आहेत.






