फोटो सौजन्य - Social Media
पेणमधील आरोग्य क्षेत्रात मोठी भर घालत गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन वास्तूचे भव्य उद्घाटन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून पेण आणि आसपासच्या भागातील रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही, अशी खात्री खासदार तटकरे यांनी या प्रसंगी दिली. त्यांनी सांगितले की, “या हॉस्पिटलच्या नावाचा समावेश शासनाच्या आरोग्य योजनेमध्ये व्हावा यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जातील.”
या उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठावर खासदार तटकरे यांच्यासोबत भाजपा उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, सौ. वेदांती तटकरे, हॉस्पिटलचे संचालक डॉ. रत्नदीप गवळी, राजेश टेलर, रोहन पंदारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. खासदार तटकरे यांनी या प्रसंगी पेणच्या नागरी व औद्योगिक विकासाचा उल्लेख केला. “पेण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.
हॉस्पिटलच्या उपयुक्ततेवर भाष्य करताना वैकुंठ पाटील म्हणाले, “गॅलेक्सी हॉस्पिटल हे पेणच्या नागरिकांसाठी वरदान ठरेल. महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे रुग्णांना वेळीच मदत मिळत नव्हती. आता या हॉस्पिटलमुळे अपघातग्रस्त आणि अन्य रुग्णांना त्वरित आणि दर्जेदार उपचार मिळतील.” डॉ. रत्नदीप गवळी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “गेल्या तीन वर्षांत गॅलेक्सी हॉस्पिटलने ११ हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. रुग्णसेवेचा हा प्रवास यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील.” गॅलेक्सी हॉस्पिटलचे संचालक राजेश टेलर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
रुग्णसेवेत नवा अध्याय सुरू
गॅलेक्सी हॉस्पिटलने पेण शहरातील आरोग्यसेवेत एक नवा अध्याय सुरू केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर्स, आणि समर्पित स्टाफच्या माध्यमातून हे हॉस्पिटल स्थानिक नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. याठिकाणी सामान्य ताप, सर्दीपासून ते हृदयविकार, मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांपर्यंत सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार सोयीस्करपणे उपलब्ध आहेत. याशिवाय, अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने मदत करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आणि जलद प्रतिसाद देणारी वैद्यकीय टीम सज्ज आहे.
पेण आणि आसपासच्या भागातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणारे हे हॉस्पिटल आरोग्यसेवेत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. उपचारांसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल, तसेच वेळेचा आणि पैशाचा मोठा बचाव होईल. यामुळे स्थानिक नागरिकांना विश्वासार्ह, दर्जेदार, आणि जलद आरोग्यसेवेचा अनुभव घेता येईल.
हा उपक्रम केवळ आरोग्यसेवेतच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीतही मोठा बदल घडवेल. गॅलेक्सी हॉस्पिटलमुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांना मजबुती मिळेल. हे हॉस्पिटल केवळ पेणच नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल. रुग्णसेवेतून विश्वास संपादन करत, गॅलेक्सी हॉस्पिटलने एका प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात केली आहे.