संग्रहित फोटो
पुणे/प्रगती करबंळेकर : पुणे शहरात चैतन्यदायी वातावरणात सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा समारोप आता समीप आला असून, शनिवारी (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन होणार आहे. यानिमित्ताने मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळांनी पारंपरिक दिमाखात मिरवणूक काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होणार असून, पुढे ती लक्ष्मी रस्त्यावरून प्रवास करत निघेल. मानाचे पाच गणपती श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम, श्री तुळशीबाग गणपती आणि श्री केसरीवाडा गणपती यांच्यासाठी विशेष रथ आणि पालखी सजवण्यात आली आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती
मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी ९ : ३० वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून अलका टॉकीज चौकापर्यंत २ : ४५ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. कसबा गणपतीची आरती उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार, यांच्या हस्ते श्रींची आरती होणार आहे.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून ९ : ४५ वाजता निघणार असून अलका टॉकीज चौकात ३ वाजता पोहोचणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघणार आहे.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची विसर्जन मिरवणूक मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून १० वाजता निघणार असून अलका टॉकीज चौकात ३ :३० वाजता पोहोचणार आहे. गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक रथ काशी विश्वनाथ या संकल्पनेवर आधारित असणार आहे.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती यंदा आकर्षक मयूर रथातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे. ३५ फूट उंच, २४ फूट लांब व १६ फूट रुंद अशा भव्य रथावर हायड्रोलीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. रथाची फुलांनी मनोहारी सजावट केली असून मंडळाच्या १२५ व्या वर्षानिमित्त महिला आणि व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधूंचा नगारा आणि ढोल-ताशा पथकांचा दणदणाट उत्साहवर्धक ठरणार आहे.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू होईल. यंदा ‘कथकली मुखवट्याच्या’ रथात गणराय विराजमान असतील. बिडवे बंधूंचा नगारा, ढोल-ताशा पथके आणि इतिहासप्रेमी मंडळाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधी जिर्णोद्धार’ हा देखावा विशेष आकर्षण ठरेल. ‘हरवलेला पोस्टमन’ ही संकल्पना देखील मिरवणुकीत सादर केली जाणार असून, केसरीवाडा गणेशोत्सव प्रमुख डॉ. रोहित टिळक यांच्यासह विश्वस्त व पदाधिकारी सहभागी होतील.
श्रीमंत दगडूशेठ गणपती
सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक गणनायक रथातून दुपारी चार वाजता बेलबाग चौकातून सुरू होईल. केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती रथावर उभारण्यात आली असून, त्यावर चार भव्य गरुडमूर्ती बसविण्यात आल्या आहेत. १६ बाय १६ फूटाचा व २४ फूट उंच रथ झुंबरे, एलईडी व पार लाइटच्या रोषणाईने सजविला आहे. मिरवणुकीत मानवसेवा रथ, स्वरूपवर्धिनी पथक तसेच केरळचे चेंदा मेलम पथक सहभागी होणार आहेत. दगडूशेठ गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला महिला-पुरुष भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची विसर्जन मिरवणूक सायंकाळी सहा वाजता टिळक पुतळा येथून सुरू होईल. सकाळी अनंत चतुर्दशीची पूजा झाल्यानंतर परंपरेनुसार ट्रस्टच्या वतीने मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात येईल. यंदा ‘श्री गणेश रत्न रथ’ आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला आहे. मिरवणुकीत श्रीराम व रमणबाग पथकांचा ढोल-ताशांचा गजर रंगत आणणार असून, रात्री अकरा वाजता पांचाळेश्वर येथे मूर्तीचे विसर्जन होणार आहे. उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी वेळेत विसर्जन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
अखिल मंडई मंडळ गणपती
अखिल मंडई मंडळाची विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला सायंकाळी सहा वाजता निघणार आहे. मंडळाच्या १३२ व्या वर्षानिमित्त श्री गणेश सुवर्णयान नावाचा जहाजाच्या स्वरूपाचा रथ साकारण्यात आला आहे. २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद या रथावर आकर्षक रोषणाई, कंदील आणि सर्चलाईटची सजावट करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधूंचा नगारा, गंधर्व बँड आणि शिवगर्जना पथकाचे ढोल-ताशा वादन उत्साह निर्माण करणार आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी रथाची निर्मिती केली आहे.