फोटो- ट्विटर
लवकरच राज्यात आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी हजारो चाकरमानी हे कोकणात आपल्या गावी जाणार आहेत. दरम्यान कोकणात जाणाऱ्या मुंबई -गोवा महामार्गाची ओळख ही खड्डेमय अशी झालेली आहे. दरम्यान गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची प्रलंबित कामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान मुंबई-गोवा महार्गाच्या पाहणीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. कोकणात जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी खड्डे लवकरात लवकर भरण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वतः फिल्डवर जात मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. जागोजागी असलेले खड्डे व ते बुजवण्यासाठी संबंधित विभागाला येत असलेल्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. त्यानंतर काहीही करून गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर आमदार भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.
महामार्गावरील खड्डे वेळेत न बुजवल्यास चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना त्रास होण्याची शक्यता आहे. गेली कित्येक वर्षे या महामार्गाचे काम रखडले आहे. मात्र पीडब्ल्यूडी अधिकारी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही हा रस्ता लवकरात लवकर नीट करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना संबंधित प्रशासकीय यंत्रणेला केली होती. त्यानुसार आज या महामार्गाचा मी स्वतः दौरा करून केलेल्या कामाची पाहणी केली. तसेच ३ सप्टेंबरपूर्वी हे खड्डे बुजवून येणाऱ्या… pic.twitter.com/SSHQnFQ2dT
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 26, 2024
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हा रास्ता लवकरात दुरुस्त करू शकतो आणि चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित करू शकतो. ज्या लोकांनी चुकीचे काम केले आहे त्यामुळे आज हे भोगावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील लक्ष घातले आहे. तसेच महामार्गावरील त्रास पाहता ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.