Satara News : शहरातील नागरिकांना गॅस पुरवठा 45 ऐवजी 25 दिवसात करावा; पाटणकरांची मागणी
पाटण : देशभरात एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम पाटण शहरासह अनेक गावात दिसू लागला आहे. सणासुदीच्या काळात लोकांची गैरसोय होणार नाही म्हणून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पाटण शहरवासियांनी तहसीलदार अनंत गुरव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शहरातील नागरिकांना गॅस पुरवठा ४५ ऐवजी २५ दिवसात करावा, गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तहसील कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाटण शहरातील गॅस सिलेंडर पुरवठा ग्रामीण भागातून काढून शहरी करण्यात यावा, तसेच सणासुदीच्या काळात गॅसचा तुटवडा जाणवू नये, यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे. शहरात गॅस एजन्सी असून एजन्सींच्या बाहेर सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात गॅस टंचाईची शक्यता व्यक्त होत असल्याने अनेक नागरिकांनी भर उन्हात सिलेंडर घेऊन गॅस भरण्यासाठी एजन्सीकडे गर्दी केली आहे. सकाळपासूनच एजन्सीसमोर लांबलचक रांगा लागत असून काही ठिकाणी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून आले आहे.
हेदेखील वाचा : युद्धामुळे विवाह अडचणीत! लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या; कॅटरिंग व्यावसायिकांची चिंता वाढली
तालुक्यातील अनेक गावात गॅसधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी ३० दिवसांची मर्यादा वाढवून आता ४५ दिवस केली असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येत्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर गॅस तुटवड्याचे मोठे संकट नागरिकांवर ओढवणार आहे.
दरम्यान, या तुटवड्याच्या काळात गॅसची बचत करावी, असे आवाहन देखील गॅस एजन्सीकडून करण्यात करण्यात येत आहे. निवेदनावर नितीन पिसाळ, सागर माने, प्रशांत पवार, समीर सय्यद, गणेशकुमार जाधव, विजयसिंह पाटणकर यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेदेखील वाचा : राज्यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती होणार; राज्य सरकारची महत्त्वाची माहिती






