जास्त त्रास देणाऱ्या विरोधकांना पक्षात घ्या, त्रास कमी होईल – गिरीश महाजन
Jalgaon News : “जास्त त्रास देणाऱ्यांना आपल्या पक्षात घ्या म्हणजे आपला त्रास कमी होईल, विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका,” असा सल्ला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याची जळगावमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.
आगामी काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. महायुती निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून, “ठाकरे आणि पवार यांना जळगावमधील एकही महानगरपालिका मिळू देऊ नका. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका ताब्यात घ्यायच्या आहेत. आपण महायुतीमध्ये लढणार आहोत; मात्र काही ठिकाणी अडचण आल्यास स्वबळावरही लढू. शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही नगरपालिका मिळता कामा नये,” असे आवाहन केले.