सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना सोन्याची अंगठी मिळणार असल्याची खासदार धनंजय महाडिक यांची घोषणा (फोटो - सोशल मीडिया)
आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान सुरू झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ८१ आरोग्यवर्धिनी केंद्र, नगरपालिका सर्व आरोग्य नागरी केंद्रे व ४१३ उपकेंद्र ठिकाणी २० प्रकारांचे उपक्रम मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सरकारी रुग्णालयामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींना सोन्याची अंगठी दिली जाणार असल्याचे घोषित केले. यावेळी त्यांनी मुलींना जन्म देणाऱ्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार महाडिक म्हणाले, “स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवा देण्यासाठी ही मोहीम आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार व आवश्यक संदर्भसेवा व समुपदेशन करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागांतील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, जागृत करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरांमध्ये महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सर निदान, यामध्ये विशेषतज्ज्ञ यांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत,” अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र यामध्ये शिबिर घेण्यात येणार आहेत. या अभियानामुळे महिलांना आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रोत्साहन मिळेल आणि गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्यवेळी उपचार सुरू करण्यास मदत होईल.” अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, सरपंच संजिवनी पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे उपस्थित होते.






