“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
बैठक असो, सभा असो की पत्रकार परिषद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी स्पष्ट आणि मिश्किलपणेही बोलताना अनेकवेळा पाहिले आहे. त्यांच्या काही विधानांमुळे वादही निर्माण झाले होते. आता आज पुण्यातील चाकणमध्ये अजित पवारांनी केलेली एक मिश्किल टिप्पणी राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यानंतर त्यांनी चाकणच्या निबे उद्योग समूहाला भेट दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी हातामध्ये एके ४७ बंदूका घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवसी यांनी नेम लावण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवारांनी उपस्थित पत्रकारांवर बंदूक रोखत “महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर बघा”, असे विधान केले अन् उपस्थितांमध्य एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले की, “आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “आता एवढंच छापतील.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण, पुणे येथे ‘निबे लिमिटेड’ प्रकल्पात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्र, व सरंक्षण सामग्रीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निबे लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, निबे… pic.twitter.com/xBEkM0w0VR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2025
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात एके४७ घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही दिसत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील चाकण येथे ‘निबे लिमिटेड’ प्रकल्पातील अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्र, व सरंक्षण सामग्रीची पाहणी केली. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निबे लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि. चे संचालक प्रकाश भामरे आदी उपस्थित होते.