Kolhapur News: कोल्हापुरकरांनो लागा तयारीला; अखेर 'ती' पुन्हा येणार!
काही महिन्यांपूर्वी माधुरी हत्तीणीच्या देखभाल आणि आरोग्याच्या कारणास्तव गुजरातमधील वनतारा येथे नेण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने तिला वनतारा येथे पाठवण्यात आले होते. तेव्हापासून तिला परत आणण्यासाठी नांदणी मठाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
दरम्यान माधुरीच्या परतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर वनतारच्या पथकाने नांदणीत येऊन माधुरीसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. नांदणीतील काही पदाधिकारीदेखील उपस्थित होते. यावेळी वनताराच्या पथकासोबत तिच्या सुरक्षित पुनरागमनाचीही चर्चाही झाल्याची माहिती आहे.
राज्य सरकार आणि नांदणी मठ आणि वनतारा यांच्यात माधुरीला आणण्यासाठी सकारात्मक घडामोडी सुरू आहेत. गेल्या वर्षी 28 जुलै 2025 रोजी माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह संपू्र्ण राज्यभरातून तिला वनताराला नेण्यासाठी विरोध करण्यात आला होता. लाखो लोकांनी तिच्यासाठी भावना व्यक्त केल्या. तेव्हापासून तिला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले आहे, नानंदणी मठ आणि वनतारा यांच्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यास माधुरीला परत आणले जाणार आहे.






