नंदिनी शर्माचा थक्क करणारा प्रवास (फोटो- ians)
नंदिनी शर्मा महिला प्रीमियर लीगमुळे खऱ्या अर्थाने चर्चेत आली. २४ वर्षीय नंदिनीचा जन्म चंदीगडमध्ये झाला. २४ वर्षीय या खेळाडूचा समावेश बीसीसीआयने थेट भारतीय महिला क्रिकेट संघात टी २० वर्ल्ड कपसाठी केला आहे. त्यामुळे अनकॅप्ड खेळाडूला बीसीसीआयने संधी दिल्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.
नंदनी शर्माचा प्रवास थक्क करणारा आहे. तिची भारतीय संघात निवड झाल्याने संपूर्ण चंदीगडसह देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘डब्ल्यूपीएल २०२६’ मुळे नंदिनी शर्मा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने लिलावादरम्यान २० लाख रुपयांच्या मूल किंमतीमध्ये संघात सामील करून घेतले होते. त्या संधीचे तिने सोने करून दाखवले. यामुळेच तिची भारतीय संघात निवड झाल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना नंदिनीने अत्यंत शानदार खेळी केली. तिने १० सामन्यांमध्ये एकूण १७ विकेट्स घेत सर्वांना चकित करून टाकले. गुजरातविरुद्ध एकाच सामन्यात तिने तब्बल ५ विकेट्स पटकावल्या होत्या. तसेच दिल्ली कॅपिटल्सच्या इतिहासात एकाच सामन्यात ५ विकेट्स आणि ‘हॅट्ट्रिक’ घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे.
नंदिनी शर्माचा जन्म चंदीगडमध्ये २० सप्टेंबर २००१ मध्ये झाला. लहानपणापासूनच तिला क्रिकेट खेळण्याची आवड होती. चंडीगडच्या गल्लीबोळात मुलांसोबत क्रिकेट खेळत क्रिकेटचे धडे गिरवले. चंडीगडच्या वरिष्ठ महिला संघाचे नेतृत्वही तिने केले आहे. २०२५ मध्ये महिला प्रीमियर लीगमध्ये तिने आरसीबीकडून नेट बॉलर म्हणून काम केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात बँकॉक येथे झालेल्या ‘वुमेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स’ स्पर्धेत तिने ‘इंडिया ए’ संघाचे प्रतिनिधित्व करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
कसा होता नंदिनी शर्माचा प्रवास?
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या नंदिनीला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. तिने तिच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात चंडीगडच्या गल्लीबोळात मुलांसोबत खेळून केली. गल्ली क्रिकेट खेळता खेळता तिच्यातील वेगवान गोलंदाजीची अचूकता तिच्या भावाने आणि प्रशिक्षकांनी ओळखली आणि तिला व्यावसायिक क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली.
घरची परिस्थिती बेटाची असताना देखील कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर तिने क्रिकेटमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि चंदीगड संघाकडून उत्तम कामगिरी केली. तिच्या जबरदस्त फॉर्ममुळे चंडीगडच्या वरिष्ठ महिला संघाचे उपकर्णधार आणि कर्णधारपदही भूषवले आहे.
टर्निंग पॉईंट
नंदिनी शर्मा या अनकॅप्ड वेगवान गोलंदाजाला बीसीसीआयने भारतीय संघात स्थान दिले आहे. डब्ल्यूपीएल आणि आशिया कपमधील याच वादळी कामगिरीच्या जोरावर तिने हे स्थान मिळवले आहे. गल्लीबोळातून सुरू झालेला तिचा हा प्रवास आज देशातील लाखो मुलींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.






