कराड : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटना यांनी १४ डिसेंबरपासून जुनी पेन्शन लागू करणे आणि इतर अन्य मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला. या संपात कराड येथील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन कराड येथील सर्व कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
या संपासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने पाठिंबा दिला असून, तिन्ही संस्थेतील राजपत्रित अधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरला एक दिवसाची सामुदायिक रजा घेतली होती, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीपराव कांबळे यांनी दिली.
यावेळी दिलीपराव कांबळे म्हणाले की, नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असून, कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही. त्यामुळे शासनाने नवी पेन्शन योजना लवकरात लवकर रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. ही लढाई आर या पारची असून, जुनी पेन्शनबाबतचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली लढा चालू राहील. यावेळी त्यांनी संपात सामील झालेल्या जुनी पेन्शन घेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.
१४ डिसेंबर रोजी सकाळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिन्ही संस्थेच्या प्रवेशव्दारावर एकत्र येऊन निदर्शने केली. त्यानंतर तहसीलदार कार्यालय कराड येथे कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीपराव कांबळे, पुणे विभागाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, स्थानिक संघटनेचे अध्यक्ष राहुल जाधव, सचिव गहिनीनाथ काळे, ए. एस, वाडते, सोमनाथ ताटे, धनाजी कांबळे, संजय निकम, बबन सूर्यवंशी, पुष्पा खाडे, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व राजपत्रित अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.