पाटण : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथीत अन्यायाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर निनावी पोस्ट व्हायरल करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीने इच्छूकांना बरीच मोठी प्रतीक्षा करावयास लावली. महाविकास आघाडीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांना महायुतीने प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावून अखेर उमेदवारी जाहीर केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना या निवडणुकीत निर्णायक भूमिका कराड व पाटण तालुक्यातील मतदार बजावतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
पाटण तालुक्यातील मतदान निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई जी भूमिका स्वीकारतात, ती कार्यकर्ते डोळे झाकून पार पाडतात, असा अनुभव आहे. त्यामुळेच खासदार भोसले यांना देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलून चालणार नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र पहिल्याच प्रचार दौऱ्यात खासदार भाेसले यांनी पालकमंत्री देसाई यांच्या गटाला डावलल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
उदयनराजे भोसले यांनी गेल्या आठवड्यात तालुक्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते; परंतु मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या देसाई गटाला निमंत्रण देण्यात आले नसल्याने त्यांच्या कार्यकत्यांत नाराजी असल्याची पोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये?
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यापूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील बंगल्याजवळच्या भिंतीवर काढण्यात आलेले उदयनराजेंचे तैलचित्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ सातारा येथे होणाऱ्या आयलंडच्या जागेला केलेला विरोध, अशा विविध कारणांमुळे देसाई गट नाराजी व्यक्त करत आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या समर्थकांकडून हा मेसेज विविध ग्रुप्सवर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.






